व्यसन प्रकार- १) चहा, कॉफी २) तंबाखु, गुटखा ३) धुम्रपान ४) मद्यपान, ५) मांसाहार ६) हॉटेल, धाबा, ७) नाटक, तमाशा ८) व्याभिचार ९) जुगार, मटका १०) भ्रष्टाचार
संस्थेची उद्दिष्ट्ये- १) अध्यात्म प्रबोधन २) व्यसनमुक्ती ३) राष्ट्रभक्ती ४) समाजसंघटन ५) अंधश्रध्दा निर्मुलन ६) वृक्षसंवर्धन ७) बलसंवर्धन ८) गोपालन
केलेल्या कार्याची माहिती-
आजरोजी गावपातळीवर व तालुका पातळीवर युवकांचे तसेच ग्रामस्थांचे संपुर्ण महाराष्ट्र भरात सुमारे २०० पेक्षा अधिक शिबिरे अथवा मेळावे घेतलेले आहेत. संपुर्ण महाराष्ट्रातून सुमारे १५००-२००० युवकांना एकत्रित करून दरवर्षी राज्य पातळीवर चार दिवसांची १४ शिबिरे घेतली असून या माध्यमातून हजारो युवकांना व्यसनमुक्तीची दिक्षा दिली आहे. १५,००० पेक्षा जास्त वेगवेगळया प्रकारच्या वृक्षांचे वेगवेगळया भागात वृक्षारोपन / वृक्षसंगोपण केले आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी करण्याआगोदर संघाने वेगवेगळया तालुक्यातील ३५ पेक्षा जास्त गावातील विक्रेत्यांचे प्रबोधन करून गुटखा विक्री बंद केलेली आहे. ओंड, ता. कराड, जि. सातार या गावातील शासनमान्य बिअरबार २५ डिसेंबर २००२ रोजी महिलांच्या मतदानाने कायम स्वरूपी बंद केला ही भारतातील पहिली घटना आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवैध दारूविक्रीच्या विरोधात युवकांनी व महिला कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. कराड तहसिल कार्यालयावर ५००० लोकांचा मोर्चा काढून दारूविरोधात शासनाला जागविण्याचे काम केले. अवैध दारूविक्री करणे हा गुन्हा अजामीनपात्र करण्यास महाराष्ट्र शासनाला भाग पाडले.
संस्थेच्या माध्यमातुन अनेक गावात स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अशा पध्दतीच्या योजनांना सहकार्य करून आदर्श गाव निर्माण करण्याचे मार्गदर्शन केले जाते. शासनाकडून पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींचा सत्कार केला जातो. राज्यातील बेरोजगार युवकांचा मुलभूल प्रश्न सोडविण्यासाठी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन युवकांना स्वयंरोजगार करण्यासाठी मदत केली जाते. सेंद्रिय शेती करण्यासाठी युवकांना व शेतकर्यांना मार्गदर्शन केले जात असून त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग राबवू लागले आहेत. कोरेगांव तालुक्यातील श्री प्रमोद बोरगे हे संघटनेचे कार्यकर्ते त्यासंबंधी मार्गदर्शन करीत असतात. रासायनिक खतामुळे जमिनींचा होणारा र्हास व अन्नातुन मानवतेवर होणारा परिणाम, फास्टफुड, व्यसनाधिनता, व्यायामाचा अभाव, ताणतणाव यामुळे हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा, मुतखडा, कॅन्सर अशा अनेक आजारांना समाज सामोरा जात आहे. त्यावर उपाय म्हणून माणसाचा योग्य दिनक्रम व आरोग्य नियम यावर प्रबोधन करण्याचे काम श्री. प्रताप कदम व श्री. सचिन शिंदे हे करीत आहेत. देशामध्ये गोमातेची हत्या होत असल्यामुळे शेतकर्यांचे परिणामी देशाचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. म्हणूनच शेतकर्यांना गाईचे महत्त्व सांगुन गोहत्या बंदिचा व गोरक्षणाचा प्रयत्न चालला आहे. युवकमित्र बंडातात्यांच्या मार्गदर्शनाखाली करवडी, राजमाची, पिंपरद अशा अनेक ठिकाणी गोशाळा तसेच सेंद्रीय खत, गांडूळ खत निर्मीतीचे प्रकल्पही उभारण्यात आले आहेत.
आजरोजी सुमारे १० जिल्ह्यातील ६० ते ६५ तालुक्यातील सुमारे १००० गावातील कमी अधिक प्रमाणात संघटनेचे कार्य संघटीतरित्या चालले आहे. आतापर्यंत १४ राज्यस्तरीय शिबीरातून सुमारे १५,००० युवकांना त्याच प्रमाणे युवतींच्या ६ राज्यस्तरीय शिबीरातून ३००० युवतींना संघटनेच्या विचारांनी प्रभावीत केले आहे. किल्ले सिंहगड, किल्ले पुरंदर, किल्ले प्रतापगड या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले असून समाजविघातक प्रवृत्ती किल्ल्यांचे पावित्र्य न राखता दारूपिण्यासाठी वापर करीत असतात अशा प्रवृत्तींना आळा घालण्यात संघटना यशस्वी झाली आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीत भामचंद्र डोंगर परिसरात ’डाऊ केमिकल्स’ या विषारी रसायने बनविणार्या अमेरिकन कंपनी विरोधात आंदोलन करून तिला या भूमितून पिटाळून लावले. युवकमित्र बंडातात्यांनी निर्माण केलेल्या या चळवळीत राजसत्तेला धर्मसत्तेपुढे झुकावे लागले. सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, नांदेड, जिल्ह्यात शासनाच्या आदेशाचा उपयोग करून १००हून अधिक शासन मान्य देशी दारू दुकाने व बिअरबार, वाईनशॉप महिलांच्या मतदानाने बंद केली. यामध्ये वैशिष्ट्येपुर्ण बाब म्हणजे १० महिने २३ दिवसात संपुर्ण जावली तालुक्यातील (जि. सातारा) १३ दारू दुकाने बंद करून देशातील पहिला दारू दुकान मुक्त तालुका होण्याचा मान मिळाला आहे.
२०११ चे दिवाळी सणाच्या वेळी जावली तालुक्यात बामणोली येथील ८ घरे आगीच्या भक्षस्थानी पडली या घरातील लोकांना तात्काळ मदत करण्याच्या हेतुने मेढा येथे फेरी काढून १५,००० हजार रूपये व धान्य, कपडे, प्लास्टीक कागद देण्यात आले. तर संघटनेच्या वतीने कराड तालुक्यातुन धान्य गोळा करून तेही पाठवण्यात आले. १०० कि. गहू, ५० कि. तांदूळ व १००० रू. बंडातात्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक कुटुंबास देण्यात आले.
संघटनेचे दादासाहेब नरळे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरद (पवारवाडी), ता. फलटण येथे बालसंस्कार केंद्र सुरू करण्यात आले असून हा उपक्रम संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. दलाल व व्यापारी यांच्याकडून ग्राहकांची होणारी लूट व दर्जाहीन धान्य व माल यामुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना चांगला माल मिळावा व शेतकर्याच्या मालाला चांगला भाव मिळवा यासाठी कडधान्य, साबुदाणा, तांदुळ, सेंद्रिय गुळ, मिरची पावडर, मसाला असा चांगला माल विक्री करण्याचे केंद्र संघटनेने सुरू केले असून घराच्या दारा पर्यंत फिरते दुकान गाडीच्या माध्यमातुन ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. संघटनेच्या मार्गदर्शनाने नवलाख उंबरे (मावळ) येथील ग्रामस्थानी कडबा प्रतिकार करून हिरानंदानीची होऊ घातलेली कंपनी बंद करण्यात यश मिळवले. जेजुरी एम.आय.डी.सी. साठी शेतकर्यांच्या संपादीत केलेल्या जमीनी अनेक वर्ष पडून आहेत तरी सुध्दा आणखी जमीन संपादीत करण्याचा घाट शासनाने घातला होता त्यामुळे या परिसरातील शेतकर्यांनी युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाने शासनाला तिव्र विरोध केला. याच प्रश्नावरून पुरंदर तालुक्यातील २००० मतदारांचे असणारे गाव मावडी कडेपठार येथील ग्रामस्थांना बंडातात्यांनी मार्गदर्शन करून जि. परिषद, पंचायत समिती निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे आहवान केले त्याला प्रतिसाद देत १००% मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकून पुणे जिल्हयात इतिहास घडविला. टोलनाक्यावर होणारी टोलधाड थांबविण्यासाठी युवकमित्र बंडातात्यांच्या मार्गदर्शनाखाली मा. हेमंत जाधव सचिव यांच्या वैविध्यपुर्ण अभ्यासातुन रात्रं दिवस सात दिवस पेरणे टोलनाक्यावर वाहनगणती करून मा. मुख्यमंत्री व संबधीत मंत्र्यांना त्याचा अहवाल पाठवला परंतु राजकारण्यांच्या आशिर्वादाने त्यांच्याच हस्तकामार्फत होणारी टोलनाक्यावरील होणारी लुट थांबवण्यासाठी शासनाने दुर्लक्ष केले परिणामत: हजारो युवकांनी पेरणे टोलनाक्यावर शांततेने आंदोलन केले यावेळी बंडातात्यांसह शेकडो युवकांना अटक करण्यात आली. एवढ्यावरच हे आंदोलन थांबणार नसून टोल नाक्याची लूट थांबेपर्यंत ते चालणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उघडी, बोडकी पोर बरोबर घेऊन स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि अवघ्या ३० वर्षात पूर्णत्वास नेले. संस्थेचे संस्थापक युवकमित्र बंडातात्यांनी तर स्वराज्यातून सुराज्य निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. त्यांचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी राज्यातील हजारो युवक या संघटनेशी जोडले गेले आहेत. आपली लढाई स्वकीयांशी आहे. म्हणूनच हे काम अवघड आहे. परंतु अशक्य नाही. परिवर्तनाच्या या कार्यात तन, मन, धन अर्पण करून राष्ट्रकार्यात सहभागी व्हा ही विज्ञापना !