युवकांच्या कल्याणार्थ प्रामाणिकपणे काम करणारी एकमेव संघटना | व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाजसुधारक

योद्धा संत - जगद्गुरू श्री तुकोबाराय ! - संतचरणरज बंडातात्या कराडकर

जगद्गुरु श्री तुकोबाराय हे एक संघर्षमय जीवन असणारे संत होत. अन्य संतांचें जीवनांत संघर्ष आला नाहीं असें नाहीं, मात्र तो संघर्ष प्रासंगिक व निमित्त मात्र होता. स्वतःचे विचारानें प्रस्थापितांना आव्हान करुन संघर्ष ओढवून घेणारे एकमेव संत आहेत जगद्गुरु तुकोबाराय !

अन्य संतांचे जीवनांतील संतांचा सामाजिक संघर्ष कसा होता हैं पाहू. ज्ञानोबारायांचे जन्मापूर्वीपासून या कुटुंबाला सामाजिक संघर्ष करावा लागला. श्री विठ्ठलपंतानीं काशी क्षेत्रीं जाऊन विधीवत् संन्यास घेतला व पुढें श्री गुरूंचे आज्ञेवरुन संसारांत प्रवृत्त झाले. इथूनच त्यांचा सामाजिक संघर्ष सुरू झाला. विठ्ठलपंतांचा अधिकार व त्यांनीं गुर्वाज्ञेनें स्विकारलेला संसार आळंदींतील कर्मठ परंतु प्रापंचिक बद्धावस्थेंतील ब्राम्हणांना कसा कळावा ? त्यानीं त्या काळचे सामाजीक प्रथेप्रमाणें या कुटूंबास वाळीत टाकलें. व तिथून विठ्ठलपंत व रुक्मिणीमाता यानीं देहांत प्रयश्चीत घेईपर्यंत सामाजिक उपेक्षा व बहिष्कार कसा सोसला हें सर्वश्रुत आहे. आई वडिलांच्या पश्चात् या चार भावंडांना तर आधार व आश्रयच राहिला नाहीं. पण ही सर्व उपेक्षा व अवहेलना त्यांनीं "शास्त्र म्हणेल जें सांडावें । तें राज्यही तृण मानावें। जें घेववी तें न म्हणावें । विषही विरु ।।" या शास्त्राज्ञेनें सहन केली. मात्र पैठणचे चमत्कारानंतर या भावंडांना समाज मान्यता मिळाली व ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्मितीनंतर सामाजीक प्रतिष्ठाही लाभली.

श्री नामदेव महाराजादी अन्य संतांना धर्म या कसोटीनें संघर्ष करावा लागला नाही, पण वर्णधर्म कसोटीनें प्रासंगीक संघर्ष करावा लागला. त्याचें सविस्तर वर्णन येथे न करतां या संतांचे जीवनांत अखंड सघर्ष नाहीं व त्यांना सामाजिक बहिष्कारास जास्त सामोरे जावें लागलें नाहीं असें दिसतें.

जगद्‌गुरु श्री तुकोबारायांचे जीवनाचा विचार करतां अखंड जीवनभर त्यांचें जीवन संघर्षमय राहीलें असें म्हणावें लागेल. येथें एक महत्वाचा मुद्दा हा आहे कीं वाङ्मय निर्मितीनंतर ज्ञानोबारायांचा संघर्ष संपतो तर वाङ्मय निर्मितीनंतर किंवा वाङ्मय निर्मिती मुळेंच तुकोबारायांचा संघर्ष सुरु होतो. आणखी एक गोष्ट अशी की वर्णधर्म तत्वानें महाराजांवर बहिष्कार झाला हा मुद्दा धरला तर त्यांचे अगोदर श्री चोखोबाराय, रोहीदास महाराज यांचे वाङ्मय वादग्रस्त ठरलें नाही. कान्होपात्रा वेश्येची कन्या असतांनाही तिच्यावर बहिष्कार झाला नाहीं. मात्र तुकोबारायांचे गाथेवर केवळ अनाधिकारी व्यक्तीकडून वेदार्थाचा उल्लेख होणें ही कशी धर्मबाह्य कृती आहे व तेवढ्याकरीतां तें वाङ्मयच नष्ट करण्याचा मंबाजीबाबा व रामेश्वर शास्त्री यानीं कां करावा याचा विचार केला पाहिजे.

 

तुकोबारायांचे जीवन दोन टप्यातील आहे, १) प्रापंचिक तुकोबाराय २) आध्यात्मिक तुकोबाराय. वयाचे २२ पर्यंत महाराजानीं प्रपंच केला आहे, "प्रपंच रचना सर्वही भोगूनी त्यागिली" या शब्दांत त्यांचें प्रापंचिक वैभव निळोबारायांनीं वर्णिलें आहे. वयाच्या १७ व्या वर्षापासून सावजींची पत्नी वारणें, सावजींचें निघून जाणें, वडील-आई जाणें, दुष्काळामुळे दिवाळे निघणें त्यामध्यें मुलगा व पत्नी वारणें इत्यादी घटना व्यवहारीक दृष्टीनें त्यांचें वैराग्य व उपरतीस कारण झाल्या व सर्वसंग परित्याग करून ते निवृत्तमार्गी झाले. इथेही त्यांचें जीवन संघर्षमय नाहीं. एक निवृत्तमार्गी व निरुपद्रवी जीव म्हणून तें समाजाचे दृष्टीत राहिलें. मात्र वयाचे ३२ व्या वर्षी गुरुपदेश व देवाज्ञेनें काव्य निर्मिती झाली व इथेच त्यांचे संघर्षाची ठिणगी उडाली.

मला अन्य संतांचे तुलनेत महाराजांचें वाङ्मय श्रेष्ठ आहे असें सांगायचें नाहीं, पण तें वेगळें आहे हें नक्की. ज्या ब्राह्मण समाजाकडून ज्ञानोबारायांचा अनन्वीत छळ झाला त्यांचें विषयींच ते ज्ञानेश्वरींत म्हणतात,

"मग वर्णामाजी छत्रचामर । स्वर्ग जयांचें आग्रहार । मंत्रविद्येसी माहेर । ब्राम्हण जे ।।" म्हणजे ब्राह्मणांचें वर्णवर्चस्व त्यानीं मान्य केलें आहे आणि कुणबी असतांनाही ब्राह्मणांचे सामाजिक प्रतिष्ठेस हात लावण्याचें साहस तुकोबारायानीं केलें आहे. अर्थात समाजांतील दाभिकांवर प्रहार करतांना त्यानीं सर्व प्रथम वैदिकांवर झोड उठविली हाच खरा कळीचा मुद्दा आहे.

समाजातील दांभिक प्रवृत्तीवर प्रहार करतांना महाराजांचे नजरेतून कोणीही सुटला नाहीं. मग तो व्यवहारीक असों वा पारमार्थिक व्यवहाराचा दंभ सांगतांना ते म्हणतात "घरीं रांडापोरें मरती उपवासी। सांगे लोकापासी थोरपण ।" तर परमार्थांतला दांभिक सांगतांना म्हणतात "देखोनि पुराणीकाची दाढी। रडे स्फुंदे नाक ओढी । प्रेम खरें दिसे जना। भिन्न अंतरीं भावना ।।" अशीं शेकडों प्रमाणें देतां येतील ज्यामध्ये त्यांनी दंभावर कोरडे ओढले आहेत. उदाहरणा दाखल एकच अभंग सांगतो. गाथ्यामध्ये १४४ क्रमांकाचा अभंग आहे. हातीं होन दाविती बेणा । करिती लेकीची धारणा ।। हा अभंग आपण सर्व पहावा म्हणजे उच्चवर्णीय ब्राम्हणांपासुन तों वैश्य शुद्रादीक । हे तों सहज नीच लोक ॥" असे चारी वर्ण कसे दांभिक आहेत हैं महाराजांनी सांगितलें आहे. आपल्या उपदेशामध्ये त्यांनीं प्रामुख्यानें पारमार्थिक दांभिकांवर घणाघाती प्रहार केला आहे. मग त्यामध्यें गोसावी, महंत, योगी, सन्यांसी, नाथपंती, महानुभवी, मलंग, फकीर इ. पैकीं कोणीही सुटला नाहीं. आपला अनन्य अधिकार सांगतांना ते म्हणतात. "जोंवरी तोंवरी सांगती संतपणाच्या गोष्टी । जंव नाहीं भेटी तुकयाची । जोंवरी तोंवरी माळामुद्राचीं भूषणें । जंव तुकयाचे दर्शन झालें नाहीं ।" या सर्वांवर आघात करतांना ज्या वैदिकांनीं समाजामध्यें वर्णभेदाचे निकषावर भेद निर्माण केले व उत्तरोत्तर खालचा समाज अनाधिकारी मानून त्यांचा ज्ञानाधीकार तर नाकारलाच पण सामाजिक प्रतिष्ठा ही नाकारली. त्या वैदिकांवर महाराजांनी दंड थोपटून कडाडून टीका केली आहे. मनुस्मृतीमध्यें म्हटलें आहे "जन्मनो जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्चते।" वेद पारायणात् विप्रो ब्रह्म जानाति स ब्राह्मणः ।" तुकोबाराय म्हणतात - अभक्त ब्राह्मण जळों त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली. याउलट, "वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळें दोन्हीं।" वैदिकांना हा टोमणा कसा सहन व्हावा? पुरुषसुक्तामध्यें विराट पुरुषापासून सृष्टी निर्मिती झाली असें सांगतांना म्हटलें आहे "ब्राह्मणोऽस्य मुखमासित् बाहु राजन्य कृतः ।। उरु तद् वै वैश्यः शूद्रो पद्भ्याम् अजायत ।" या वर्णनाचे आधारे वैदिकांनी एकतर्फी जाहीर केलें कीं मुखस्थानीं ब्राह्मण म्हणुन तो श्रेष्ठ व अन्य उत्तरोत्तर कनीष्ठ. या वैदिकांना त्याच पुरुषसुक्ताचे आधारें तुकोबाराय  विचारतात "अवघी एकाचीच वीण। तेंथे कैंचे भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ।" हा फटका वैदिकांना झोंबणारा नाहीं कां ? वेदोच्चाराचा मक्ता आपणाकडेंच आहे असें माननाऱ्या वैदिकांना तर महाराजांनीं हमालाची उपमा दिली. "वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा । येरांनीं वहावा भार माथा ।।" भगवान परखुरामांनीं २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली या आधारें ब्राह्मणांनी जाहीर केलें कीं कलीयुगामध्यें दोनच वर्ण आहेत. १) ब्राह्मण २) शुद्र आणि त्याच ब्राह्मत्वाच्या अभिनीवेशी वैदीकांना महाराजानीं आव्हाण केलें. "वेश वंदाया पुरतें । कोण ब्राह्मण निरुते ? ।। "सारांश अशीं शेकडों प्रमाणें आहेत ज्यामध्यें महाराजानी त्या वेळचे समाज प्रमुख ब्राह्मणवर्गाचे प्रतिष्ठेलाच धक्का दिला व संपुर्ण काव्यच बुडविण्याचें संकट ओढावुन घेतले. इथेही त्यानीं रामेश्वरांची आज्ञा शास्त्राज्ञा म्हणून मानली पण आपलें काव्य प्राकृत नाहीं तें देवाज्ञेचा प्रसाद आहे म्हणून १३ दिवस सत्याग्रह केला व जलदिव्यानें हें काव्य वेदतुल्य आहे हैं सिद्ध करून दाखवलें. मला महाराजांचा ब्राह्मणद्वेष मांडायचा नाहीं किंवा मी ब्राह्मणद्वेष्टा नाहीं, मात्र वैदिकांचे संघर्षांत अवघे जीवन घालवणारा हा योद्धा संत आहे. असें माझें मत आहे.

व्यसनमुक्त युवक संघाचा वार्षीक प्रतापी संस्कार सोहळे २००० सालापासून आम्ही क्षात्र तीर्थ प्रतापगड पासून अनेक ऐतिहासिक किल्ले व रणतीर्थावर संपन्न केले. यावर्षी आमचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्तानें "आम्ही वीर झुंजार" म्हणवणाऱ्या या योद्धा संताचें भूमित हा २५ वा सोहळा दिनांक ८ मे तें १५ मे संपन्न होत आहे. म्हणून सर्व युवक-युवतींनी या मध्ये प्रचंड बहुसंख्येनें सहभागी व्हावें, या विनंतीसह शब्दांना विराम ।

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिप्राय द्या